पट्टणकोडोलीतील छत्रपती शिवरायांची मूर्ती दर्शनासाठी खुली करावी : हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी
कोल्हापूर - पट्टणकोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दर्शनासाठी खुली करावी. यासह कागल तालुक्यातील करनूरमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
हातकलंगले तालुक्यातील पट्टणकोडली येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सध्या चारही बाजूने पत्र्याच्या शेडने पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती आच्छादनातून मुक्त करून दर्शनासाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर कागल तालुक्यातील करनूर या ठिकाणी विशिष्ट समाजातील लोकांनी केलेल्या दगडफेकीमुळे धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी मनोहर सोरप, शिवानंद स्वामी, उदय भोसले, अशोक गुरव, पूजा शिंदे, निरंजन शिंदे, आदित्य कराडे, आदित्य शास्त्री, महेंद्र अहिरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.