गॅस सिलेंडर दरवाढ तात्काळ मागे घ्या : इचलकरंजीत काँग्रेसचे आंदोलन...

<p>गॅस सिलेंडर दरवाढ तात्काळ मागे घ्या : इचलकरंजीत काँग्रेसचे आंदोलन...</p>

इचलकरंजी - केंद्र सरकारने नुकतीच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ६० रुपये तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ११४ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडू लागला आहे. आधीच महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना सरकारकडून करण्यात आलेली ही दरवाढ म्हणजे जनतेची पठाणी लूट असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशांक बावचकर यांनी केली आहे. सिलेंडर बुकिंगचा कालावधीही वाढवण्यात आल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने हॉटेल, खानावळी, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या दरवाढीचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरवाढीच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज निदर्शने करण्यात आली. सरकारने सिलेंडरच्या वाढवलेल्या किमती तातडीने कमी कराव्यात आणि व्यावसायिकांना सिलेंडर सहज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, सचिन साठे, नारायण बोंगार्डे, ताजुद्दीन खतीब, लक्ष्मी नलवडे, शुभांगी मुसळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.