वाहतूक कोंडी आणि प्रदूषण फक्त रिक्षांमुळे होते का? : कोल्हापूर जिल्हा तीन आसनी रिक्षा संघटनेचा सवाल
परिवहनमंत्र्यांनी दिलेली कारणे हास्यास्पद असल्याचा आरोप
कोल्हापूर - परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल राज्यभरात रिक्षांना नवे परवाने द्यायला स्थगिती दिली आहे. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात होणारी वाढ रोखण्यासाठी रिक्षा परवान्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्हा तीन आसनी रिक्षा संघटनेने या निर्णयावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नवे परवाने देणे थांबले तर रिक्षा व्यवसायातून होणाऱ्या रोजगार निर्मितीचे काय होणार? वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला फक्त रिक्षाच कारणीभूत आहेत का? अन्य वाहनांमुळे प्रदूषण आणि वाहतूक कोंडी होत नाही का? असे प्रश्न उपस्थित करत संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अॅडव्होकेट बाबा इंदूलकर यांनी, राज्यातल्या काही शहरांमध्ये रिक्षांमुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण होत असेल पण कोल्हापूरात तशी परिस्थिती आहे का? परिवहन विभागाने त्या संदर्भात काही माहिती घेऊन निरीक्षणे राज्य सरकारला पाठवलीयत का ?, कोल्हापूर शहराचा विचार केला तर शहरांतर्गत वाहतूकीसाठी उपलब्ध असलेली केएमटी सेवा रात्री बंद झाल्यानंतर प्रवाशांना वाहतूकीसाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा निकष कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रिक्षांचे प्रमाणच कमी तिथं लागू होतो का? अशा प्रश्नांचा भडीमार प्रादेशिक परिवहन अधिकारी भोर यांच्यावर केला. यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी नवे परवाने स्थगितीचा निर्णय फक्त कोल्हापूरसाठी नाही तर संपूर्ण राज्यासाठी असल्याचे सांगितले. या संदर्भात कोल्हापूर जिल्हा तीन आसनी रिक्षा संघटनेच्या भावना आपण परिवहन आयुक्तांपर्यंत पोहचवू असेही त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेने वाहतूक कोंडी आणि प्रदूषण ही कारणे कोल्हापूरच्या रिक्षा व्यवसायाला लागू होत नसतील तर कोल्हापूरातील रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया स्थगित करु नये, अशी मागणी केली आहे.
निवेदन सादर करताना अॅडव्होकेट बाबा इंदूलकर, सुभाष शेटे, ईश्वर चन्नी, अविनाश दिंडे, विजय गायकवाड, नरेंद्र पाटील, राकेश गायकवाड, राजेंद्र थोरावडे आदी उपस्थित होते.