गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्यमंत्र्यांना निवेदन

<p>गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्यमंत्र्यांना निवेदन</p>

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन (सिटू संलग्न) यांच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची सर्किट हाऊस येथे भेट घेऊन विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. कॉ. चंद्रकांत यादव व शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही भेट घेतली.

महाराष्ट्रात सन २००५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली असून राज्यात सुमारे ३९०० पेक्षा अधिक गटप्रवर्तक महिला आशा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. बहुतांश महिला पदवीधर असून त्यांची ११ महिन्यांच्या करारावर नियुक्ती केली जाते. मात्र करारावर काम करूनही कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ व अधिकार गटप्रवर्तकांना दिले जात नसल्याची तक्रार युनियनने केली आहे.

गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत, तोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५ ऑक्टोबर २०२० पासून लागू असलेली वेतनश्रेणी लागू करावी, दरमहा किमान ३५ हजार रुपये वेतन द्यावे आणि सामाजिक सुरक्षा लाभ द्यावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच आशांप्रमाणे आरोग्यवर्धिनी प्रोत्साहन भत्ता, भरपगारी प्रसूती रजा, दरवर्षी २० किरकोळ रजा व १२ सार्वजनिक सुट्ट्या देणे, ‘आशा सुपरवायझर’ हे नामकरण करणे, बायोमेट्रिक सक्ती रद्द करणे, मोबाईल भत्ता किमान १ हजार रुपये देणे, रिक्त पदांवर गटप्रवर्तकांची नियुक्ती करणे, रेकॉर्ड कीपिंगसाठी ५ हजार रुपये मानधन देणे तसेच ऑनलाईन कामासाठी लॅपटॉप किंवा टॅब उपलब्ध करून देणे, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या जिल्हाध्यक्षा उज्वला पाटील, गटप्रवर्तक अध्यक्षा मनिषा पाटील, खजिनदार संगिता पाटील, सचिव हेमा कांबळे यांच्यासह वसुधा बुडके, प्रज्ञा राजिगरे, जयश्री पाटील, राजश्री भाटे, सिंधु पाटील, प्रगती कांबळे, संध्या जाधव, सुनिता पाटील, अर्चना खोड, शितल रेडेकर व स्वाती कांबळे उपस्थित होत्या.