आरटीओ कार्यालयाने कामकाजात पारदर्शकता आणून वाहनधारकांची अडवणूक थांबवण्याची मागणी
कोल्हापूर - केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे अनेक तरुण वाहन खरेदी-विक्री व्यवसायात उतरले आहेत. मात्र कोल्हापूर आरटीओ कार्यालयात वाहन ट्रान्सफर प्रक्रियेत अनावश्यक विलंब होत असल्याने तरुण उद्योजक आर्थिक अडचणीत सापडत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजातील दिरंगाई, जाचक अटी आणि ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटींविरोधात महाराष्ट्र क्रांती सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वाहन हस्तांतरण, एचपी कमी करणे आणि डुप्लिकेट आरसी आदी कामांसाठी ३० ते ४५ दिवस विलंब होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अर्ज साक्षांकित असतानाही आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ओटीपीची सक्ती केली जात असल्याबाबत संघटनेने सवाल उपस्थित केला आहे. तसेच एचएसआरपी नंबर प्लेट संदर्भात शासनाने मुदतवाढ दिली असताना अपॉइंटमेंट पावतीची सक्ती करून कामे अडवली जात असल्याची तक्रार करण्यात येत आहे. प्रशासनाने तात्काळ खुलासा करून कामकाज सुरळीत करावे, अन्यथा आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र क्रांती सेनेने आज निवेदनाद्वारे दिला आहे.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख उदय लाड, अजित पाटील, जयदीप शेळके, संदीप पाटील, विजय जाधव, अभिमन्यू पाटील, बंडा मुसळे, बाबा मुजावर, स्वप्नील बहिरशेट, कमलेश नाझरे, संपत चौगुले, अजित खाडे, शब्बीर शेख, मौला मुल्ला, अरुण खाडे, प्रणित चितारी उपस्थित होते.