भारत _ अमेरिका व्यापारी करार हा भारतीय शेतकऱ्यांसाठी घातक - किसान काँग्रेसचा आरोप

<p>भारत _ अमेरिका व्यापारी करार हा भारतीय शेतकऱ्यांसाठी घातक - किसान काँग्रेसचा आरोप</p>

कोल्हापूर – भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेस पक्ष, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने भारत-अमेरिका व्यापारी कराराच्या विरोधात आज जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार आणि अमेरिका सरकार यांच्यात झालेला व्यापारी करार भारतीय शेती व शेतकरी वर्गासाठी घातक ठरणार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.


निवेदनात म्हटले आहे की, हा व्यापारी करार नसून भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकेसमोर आत्मसमर्पण असल्यासारखा आहे. आयात-निर्यातीवरील कर संरचनेत मोठी विषमता असून भारतीय शेतमालावर १८ टक्के कर आणि अमेरिकन शेतमालावर शून्य टक्के कर लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.


भारतीय शेती पारंपरिक पद्धतीवर आधारित असून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. दुसरीकडे, अमेरिकेतील शेती ही अत्याधुनिक तंत्रज्ञान, जीपीएस आणि स्वयंचलित यंत्रणांवर आधारित आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या अमेरिकन शेतकऱ्यांशी स्पर्धा करणे भारतीय शेतकऱ्यांसाठी अशक्यप्राय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “जमिनीवरून चालणाऱ्याची विमानाशी स्पर्धा लावण्यासारखी ही परिस्थिती आहे,” असा उल्लेखही करण्यात आला आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात ऊस, दुग्धोत्पादन आणि सोयाबीन हे प्रमुख उत्पादन असून, या करारानुसार संबंधित उपपदार्थांची मोठ्या प्रमाणावर आयात झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसून बेरोजगारी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


या कराराचा तातडीने पुनर्विचार करून शेतकरी व शेतीच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 


यावेळी जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस सागर शं. कोंडेकर, तालुकाध्यक्ष संदीप पाटील (राधानगरी), रणजीत पाटील (कागल), संतोष पवार (पन्हाळा), राजाराम निउंगरे, दत्तात्रय चौगुले, मोहन पाटील, रामचंद्र पाटील, राहुल घरात, अमोल कात्रे, रुपेश चौगुले आदी उपस्थित होते.