कामगार विरोधी चार श्रम संहिते विरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपाला इचलकरंजीत चांगला प्रतिसाद...
इचलकरंजी - कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणारे २९ कायदे केंद्र सरकारने रद्द करून नवीन चार श्रम संहिता कायदे लागू केले आहेत. या निर्णयाविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. हा निर्णय कामगारविरोधी असल्याचा आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या नव्या कायद्यांमुळे रोजगाराची सुरक्षितता कमी होईल, कंत्राटी पद्धतीला चालना मिळेल आणि कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात येतील, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात कामगारांनी आज देशभर संप पुकारला होता.
या देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने कामगार एकत्र आले आणि त्यांनी सरकार विरोधात घोषणा देण्यास सुरवात केली आहे. चार श्रम संहिता कायदे रद्द करा, कामगारांचे हक्क अबाधित ठेवा, कामगार कायदे मोडीत काढणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला.
यानंतर संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात चारही श्रम संहिता तात्काळ मागे घ्याव्यात, कामगारांना पूर्वीप्रमाणे कायदेशीर संरक्षण द्यावे आणि कामगारविरोधी धोरणे थांबवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात कॉम्रेड भरमा कांबळे, सदा मलाबादे, नूर महंमद बेळकुडे, आनंदा गुरव, शामराव कुलकर्णी, राजेंद्र निकम, सुनील बारवाडे, हणमंत लोहार, वर्षा घट्टे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संयुक्त कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे.