गौरवाड ते शेडशाळ रस्त्यांच्या दर्जाबाबत स्वराज्यक्रांती जनआंदोलन महाराष्ट्र संघटना आक्रमक
कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील गौरवाड ते शेडशाळ या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून काम सुरु आहे. या रस्त्याच्या दर्जाबाबत स्वराज्यक्रांती जनआंदोलन महाराष्ट्र या संघटनेने आक्षेप घेतला आहे. या रस्त्याच्या पहिल्या स्तराचे काम झाले आहे. रस्त्यावरील खडी उखडत असल्याने स्वराज्य क्रांती जनआंदोलन संघटना आक्रमक झाली आहे. रस्त्याचा दर्जा तपासून या निकृष्ठ कामाची चौकशी करावी आणि दोषी कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. संघटनेचे गजानन पवार हे आमरण उपोषणाला बसले असून या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशारा दिला आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदम मुजावर, जिल्हाध्यक्ष कैलास काळे, राजू गडीवडर, सुनील रेपे, ओंकार नार्वेकर आदी उपस्थित होते.