अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात निदर्शने...

<p>अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात निदर्शने...</p>

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवत असताना, त्यांच्या मूलभूत आणि न्याय्य मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असून बालकांचे पोषण, शिक्षण, लसीकरण, आरोग्य मोहिमा, सर्वेक्षण, निवडणूक कामी यासह इतर शासकीय कामांचा वाढता भार त्यांच्यावर टाकण्यात आला आहे. मात्र अंगणवाडी सेविकांना त्याबद्दल अत्यल्प मानधन दिले जात आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.

 अंगणवाडीची वेळ साडे दहा ते पाच करावी. उन्हाळ्यात ही वेळ साडेसात ते दुपारी एक करावी. प्रोत्साहन भत्ता सर्व सेविकांना त्वरित देण्यात यावा. मातृवंदना कामाचे ट्रेनिंग द्यावे. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना देण्यात आले. यातील स्थानिक स्तरावरील अनेक मागण्या मान्य करण्यात आल्याचे माहिती संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले.

येत्या बारा फेब्रुवारी रोजी एक दिवशीय लाक्षणिक संप असल्याने अंगणवाड्या आहारासहित बंद राहतील. त्याचबरोबर संप असल्याने दिवसाचा आहार वाटपाची सक्ती करू नये, याची पूर्वकल्पना सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आली. यावेळी संघटनेच्या सचिव शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, वर्षा लवटे, जयश्री पवार, ममता साठे, रेखा पाटील, भाग्यश्री लकडे, प्रतिभा कांबळे, सुवर्णा माने यांच्यासह इतर अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.