संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज -प्रशासक के. मंजूलक्ष्मी

कोल्हापूर – कोल्हापुरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे, आणि संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर शहराच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पूरबाधित भागातील नागरिकांसाठी स्थलांतर केंद्रे सज्ज ठेवण्यात आली असून आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. शहरातील धोकादायक झाडे आणि उन्मळून पडलेली झाडे उद्यान आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने हटवण्यात येत आहेत.
ज्या भागांमध्ये दरवर्षी पूराचे पाणी शिरते, त्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पूरपरिस्थितीत औषधे, पिण्याचे पाणी, टँकर व आवश्यक साहित्य तत्परतेने उपलब्ध राहील, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचा आधार घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.