परंपरेबरोबर विधायकता जपा... ; गणेशोत्सव मंडळांना पोलीस दलाचे आवाहन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाकडून गणेश मंडळांना सूचना

<p>परंपरेबरोबर विधायकता जपा... ; गणेशोत्सव मंडळांना पोलीस दलाचे आवाहन</p>

कोल्हापूर - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच राजर्षी शाहू स्मारक भवन येथे  पार पडली.

या बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक उत्साहात गणेशोत्सव साजरा करताना मानवी आरोग्याला धोका पोहचवणाऱ्या लेसरचा वापर करु नये, डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा आणि वेळ पाळावी, असे आवाहन केले. गणेशोत्सव मंडळांनी वाहतुकीला अडथळा ठरेल असे मंडप उभारू नयेत. गणेशोत्सव मंडपाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखाव्यांच्या दरम्यान गर्दी होऊन वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी विशेष दक्षता घ्यावी तसेच देखावे पाहण्यासाठी महिला आणि मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आणि पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते गतवर्षी विधायक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील काही सूचना मांडल्या.

या बैठकीला पोलीस निरीक्षक संजीव झाडे, श्रीराम कन्हेरकर, गजानन सरगर उपस्थित होते. या बैठकीला कोल्हापूर जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनचे सागर गवळी यांच्यासह मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.