कागल - सातारा महामार्गाच्या कामाची प्रगती दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा : ना. हसन मुश्रीफ

ना. हसन मुश्रीफांनी हायवे अॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना सुनावलं

<p>कागल - सातारा महामार्गाच्या कामाची प्रगती दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा : ना. हसन मुश्रीफ</p>

कोल्हापूर - कागल तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कागल- सातारा महामार्गाच्या कामाबाबत मंत्री मुश्रीफ यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीचे संजय कदम यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. नामदार हसन मुश्रीफ यांनी महामार्गाच्या सातारा ते कागल टप्प्यातील सहापदरीकरणाचे काम संथगतीने सुरु असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी अपुऱ्या कामांमुळे महामार्गावरुन जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने कामात प्रगती दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा शब्दांत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीतील गेल्या वर्षभरा पासून बंद असलेल्या ओसवाल एफ एम हॅमरले टेक्सटाईल कंपनीच्या कामगारांच्या थकीत देण्यांबाबत तसंच कंपनी वरील कर्ज बोजाबद्दल तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना केली. जिल्ह्यातील एकोणतीस प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींच्या जमिनींची मोजणी करुन प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या सुविधा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात, असंही नामदार मुश्रीफ यांनी सूचित केले आहे. नामदार मुश्रीफ यांनी दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबतही चर्चा केली.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, कागल राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले त्यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.