संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृहाच्या पुनर्बांधणीचं काम दर्जेदार होईल – मंत्री उदय सामंत

कोल्हापूर - संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीस थोडा विलंब झाल्याचे मान्य करत, हे काम पूर्णतः दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण करून नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच भव्य स्वरूपात पुन्हा उभारले जाईल, असा विश्वास उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. आज त्यांनी रंगकर्मींसमवेत नाट्यगृहाच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. या वेळी २५ कोटी रुपयांच्या निधीमधून सुरु असलेल्या कामांबाबत कोल्हापूर महापालिकेला आवश्यक त्या सूचना दिल्या.
मंत्री सामंत म्हणाले की, जुने वास्तु-सौंदर्य टिकवून, हेरिटेज डिझाइन जपून नाट्यगृहाचे आधुनिकीकरण करण्यात यावे. ग्रीन रूम, बसण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना यांसारख्या सुविधांची गुणवत्ता किमान ३०-३५ वर्षे टिकेल इतकी असावी. वीज खर्च कमी करण्यासाठी बाजूच्या मोकळ्या जागेचा वापर करून सोलर संयंत्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खासबाग मैदानाचा रंगमंच उच्च दर्जाने विकसित करण्यात येणार असून, नाट्यगृह रिकाम्या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी चित्रपट दाखवण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
या पाहणीवेळी नाट्य क्षेत्रातील मिलिंद अष्टेकर, आनंद कुलकर्णी, सुनील घोरपडे, नाट्य परिषदेचे संचालक व इतर रंगकर्मी उपस्थित होते. याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवीकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक अभियंता सुरेश पाटील, मिलिंद पाटील, नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाब्री आणि इतर अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.