आरटीई अंतर्गत प्रवेशापासून १२०० विद्यार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या शाळांची चौकशी करा
आपची मागणी

कोल्हापूर - आरटीई अंतर्गत प्रवेश मोफत असताना देखील काही खाजगी शाळा पालकांची दिशाभूल करून, त्यांच्याकडून फीची मागणी करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तुम्हाला फी भरावीच लागेल असं सांगून जिल्ह्यातील १२०० विद्यार्थ्यांना नॉट अप्रोचड संवर्गाखाली टाकून त्यांचा प्रवेशच रद्द करण्यात आल्याचे आम आदमी पार्टीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या निदर्शनााला आणून देण्यात आले आहे.
आपने बाराशे विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेशा पासून वंचित ठेवणाऱ्या शाळांची चौकशी करावी, अशी मागणी केलीय. ३२८ आरटीई नोंदणीकृत शाळांमध्ये १०० टक्के आरटीई कोटा भरल्या नसल्याचेही आपने निदर्शनाला आणून दिले आहे.
यावर बोलताना प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी या संदर्भात चौकशी करण्याबाबतचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. तसंच लवकरच खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, किरण साळोखे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समिर लतीफ, विजय हेगडे, उमेश वडर, ऋषी वीर, आदित्य पोवार, रमेश कोळी, दिलीप पाटील, विशाल सुतार आदी उपस्थित होते.