सावकारी रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करुन आदर्श निर्माण करा 

 पालकमंत्र्यांचे निर्देश

<p>सावकारी रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करुन आदर्श निर्माण करा </p>

कोल्हापूर -  पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध योजनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

 या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि तालुका स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, घरकुलासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांसंदर्भात काही सूचना दिल्या. लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्यासाठी महसूल विभागाने पासेस वितरीत करावेत, घरकुल बांधकामासाठी गवंड्यांची कमतरता भासू नये. यासाठी गवंड्यांचे प्रशिक्षण घ्या. परंतु कोणत्याही कारणाने घरकुलांचे बांधकाम अडणार नाही, आणि या कामी दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्या. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार चोख अंमलबजावणी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. उमेद मॉलच्या माध्यमातून बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून द्या.

एकदा ठरवलं की कोणताही उपक्रम यशस्वी होतोच, हे कोल्हापूर जिल्ह्याने आजवर दाखवून दिले आहे. कोल्हापूर हा समृध्द जिल्हा असून जिल्ह्यातील एकाही महिलेला, आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी कंपनीकडून कर्ज घ्यायला लागू नये, यासाठी शासकीय यंत्रणा आणि बँकांनी प्रयत्न करावेत. बांगलादेशाच्या मोहम्मद युनूस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सावकारी रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करा आणि जगासमोर आदर्श निर्माण करा, अशा सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी दिल्या.