“महापौरांचा अतिक्रमणावर ‘हातोडा’ इशारा; केएसबीपी चौकातील कारवाईवर प्रश्नचिन्ह – ‘तोंडे बघून कारवाई’चा आरोप”
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर आता महापौर रूपाराणी निकम यांनी थेट ‘हातोडा’ मारण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, गुरुवारी केएसबीपी चौक परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. मात्र या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ठराविक गाड्यांवरच कारवाई करण्यात आल्याचा आणि “तोंडे बघून कारवाई” केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
हॉकर झोन नसताना केएसबीपी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात खाऊगाड्या कशा लावल्या जातात, असा सवालही उपस्थित होत आहे. महापालिकेकडून काही गाड्या हटवून साहित्य जप्त करण्यात आले, मात्र उर्वरित गाड्यांवर कारवाई न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
बिंदू चौक आणि राजारामपुरी परिसरातील बायोमेट्रिक कार्डधारकांना परवानगी असतानाही केएसबीपी चौकातच गाड्या कशा लावल्या जातात, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पुनर्वसनाबाबत महापालिकेकडून कोणतेही स्पष्ट पत्र किंवा निर्णय नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
प्रशासन काळात या गाड्या वाढल्याचा दावा काहींकडून केला जात असतानाच, एका बायोमेट्रिक कार्डवर चार-चार गाड्या लावून त्या भाड्याने देण्याचा प्रकार समोर येत आहे. अशा माध्यमातून काही कार्डधारक दरमहा 50 ते 60 हजार रुपयांचा आर्थिक फायदा घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महापालिकेच्या जागेचा वापर करूनही शहराच्या तिजोरीत कोणताही महसूल न मिळता खासगी स्वरूपात व्यवसाय चालवला जात असल्याने प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून केएसबीपी चौकात गुरुवारी कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, काही कार्डधारक उपस्थित नसल्याने पूर्ण कारवाई होऊ शकली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील सुमारे 5070 बायोमेट्रिक कार्डधारकांची तपासणी सुरू असून, जे अनधिकृत आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
मात्र, कारवाईतील निवडकपणा आणि अंमलबजावणीतील ढिलाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर आता नागरिकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहरातील अनेक भागांत राजकीय पक्षांची अनधिकृत कार्यालये आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे यावर कठोर कारवाई केली जाणार आहे का ? हे नूतन महापौर आणि आयुक्त यांच्या कृतीतून आगामी काळात पाहायला मिळणार आहे.