"कोल्हापूरात काम करण्याचा अनुभव म्हणजे अंबाबाईची सेवा केल्यासारखा होता"; मावळत्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांचे भावोद्गार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. महापालिकेच्या छत्रपती शाहू सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास महापौर, पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर रुपाराणी निकम यांनी आपल्या मनोगतात आयुक्त मंजूलक्ष्मी यांनी आव्हानात्मक परिस्थितीतही महापालिकेचा कारभार सक्षमपणे सांभाळल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कोल्हापूरसारख्या उच्च अपेक्षा असलेल्या शहरात त्यांनी प्रभावीपणे प्रशासन चालवले, असेही त्या म्हणाल्या.
विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी त्यांच्या सकारात्मक कार्यपद्धतीचा उल्लेख करत, त्यांच्या कार्यकाळात कधीही नकारात्मक अनुभव आला नसल्याचे नमूद केले.
नगरसेवक जयंत पाटील यांनी त्यांच्या शिस्तबद्ध कारभाराचे कौतुक करत, कमी उत्पन्नाच्या परिस्थितीतही महापालिकेचा कारभार सक्षमपणे हाताळल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यकाळात केशवराव भोसले नाट्यगृह प्रकल्पाला गती मिळाली तसेच ५०७ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात आली.
आपल्या निरोपपर भाषणात आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी, कोल्हापूरमध्ये काम करण्याचा अनुभव “अंबाबाईची सेवा केल्यासारखा” असल्याचे सांगितले. महापालिकेच्या कामकाजातून मौल्यवान अनुभव मिळाल्याचे नमूद करत त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेने अधिक प्रगती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम काटकर यांनी केले, तर आभार रविकांत आडसूळ यांनी केले.
कार्यक्रमास उपमहापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, गटनेते शारगंधर देशमुख, इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक संजय मोहिते, ऋतूराज क्षिरसागर, विजयसिंह देसाई, उमेश पोवार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.