“पाणी उपसा 208 एमएलडी, वापर फक्त 60 एमएलडी..! उर्वरित पाणी जातं कुठं?” – कोल्हापूर महापालिकेच्या सभेत पाणी प्रश्नावर खळबळ

<p>“पाणी उपसा 208 एमएलडी, वापर फक्त 60 एमएलडी..! उर्वरित पाणी जातं कुठं?” – कोल्हापूर महापालिकेच्या सभेत पाणी प्रश्नावर खळबळ</p>

कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज शहरातील पाणी प्रश्नावर विशेष सभा आयोजित करण्यात आली.. या सभेत पाणी चोरी, पाणी मीटर, पाणी बिल यांसारख्या महत्त्वाच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. आणखी कोणत्या सुधारणा करता येतील, यावर सदस्यांनी आपली मतं मांडली. 

आपण एक रुपये वीस पैशांनी पाणी घेतो आणि नऊ रुपये वीस पैसे नागरिकांना बिल लावतो. इतका फरक असूनही महापालिका तोट्यात का आहे? याबाबत महापौर रुपाराणी निकम यांनी जल अभियंता आणि आयुक्तांकडं स्पष्टीकरण मागितलं. यावेळी जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी पाणी योजना, पाणी वितरण आणि पाणी बिल याबाबत सविस्तर माहिती दिली. शहरात सुमारे १ लाख ६ हजार ४१ पाणी कनेक्शन असून त्यामध्ये औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती कनेक्शनचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.

शहरात दररोज सुमारे २०८ एमएलडी पाणी उपसा केला जातो. मात्र त्यापैकी फक्त ६० एमएलडी पाणी वापरलं जाते. उर्वरित सुमारे १४० एमएलडी पाणी नेमकं कुठं जातं, असा सवाल नगरसेवकांनी सभेत उपस्थित केला. पूर्वी शिंगणापूर आणि बालिंगा इथून शहराला पाणी पुरवठा केला जात होता. आता थेट पाईपलाईन योजना सुरू करण्यात आली असली, तरी वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे अनेक भागात नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नसल्याचं यावेळी निदर्शनास आणून देण्यात आलं..

दरम्यान, नगरसेवक विजय देसाई यांनी पाणीबिलासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. काही अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी उपजलअभियंता रावसाहेब चव्हाण हे देसाई यांच्याकडं बोट दाखवत अचानक संतापले. त्यामुळं सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं उपस्थित नगरसेवकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आणि त्यांना पोलिसांच्या मदतीनं सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आयुक्तांनी याप्रकरणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
याचवेळी नगरसेवक विनायक कारंडे यांनी अधिकारी प्रिया पाटील यांच्यासह काही अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार केली. यावर महापौर निकम आणि आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना खडसावल.

दरम्यान, सभा सुरू झाल्यानंतर महायुतीतील काही गटनेते आणि नगरसेवक सुमारे दोन तास सतत बोलत असल्यानं इतर सदस्य नाराज झाले. यावेळी भाजपचे विजेंद्र माने यांनी महापौरांकड बोलण्याची मागणी केली.

आजच्या सभेत नगरसेवक राहुल माने, प्रतापसिंह जाधव, वैभव माने, दिपाली घाटगे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी आपले मुद्दे मांडले आणि त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली.

एकंदरीत, पाणीपट्टी संदर्भात झालेल्या या विशेष सभेत पाणी गळती कधी थांबणार आणि पाणी बिल सहा महिन्यांनी का दिलं जातं, यासारखे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. पाणी विभागातील अधिकाऱ्यांना महापौर आणि नगरसेवकांनी चांगलंच धारेवर धरलं मीटररीडर वर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.. येत्या महिनाभरात या सर्व मुद्यांचा सविस्तर अभ्यास करून सभेत मांडलेल्या विषयांवर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना महापौर रुपाराणी निकम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेला मिळकत करून द्या, तेव्हाच तुमचे पगार निघतील, असा इशारा महापौर निकम यांनी यावेळी दिला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती कौसर बागवान, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसेवकांसह महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते.