महापालिकेच्या स्थायी समिती सभेत धोकादायक झाडं, वृक्षतोड ठेका, अनधिकृत बांधकामं या विषयांवर चर्चा
कोल्हापूर - महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत आज धोकादायक झाडं, वृक्षतोड ठेका, अनधिकृत बांधकामं आणि प्रशासनाच्या कामकाजावरून जोरदार चर्चा झालीय. सदस्यांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरत तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत शहरातील धोकादायक झाडं आणि फांद्यांमुळं निर्माण झालेल्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली.सभापती विशाल शिराळे यांनी शहरात झाडांच्या फांद्या कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या‘बुम’यंत्रांची संख्या अपुरी असल्याचं सांगितलं. एका बुमवर संपूर्ण शहरातील काम होणं शक्य नसल्यानं पुढील तीन महिन्यांसाठी किमान दोन अतिरिक्त बुम भाड्यानं घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसंच या संदर्भात शिवकृपा कार्पोरेट सर्व्हिसेस, ज्ञानेश्वर बापूराव बांड आणि निरमाकंस्ट्रक्शन या तिन निविदा आल्याचं सभापती शिराळे यांनी स्पष्ट केलं. त्यावर नगरसेवक आदिल फरास, अमर समर्थ, प्रविण सोनवणे, अनुराधा खेडकर, अर्चना पागर, राजनंदा महाडिक यांनी बैठकीत काही मुद्दे उपस्थित केले.
दरम्यान, नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांनी निविदेतील अटी आणि शर्तींची सविस्तर माहिती देण्याची मागणी केली. महापालिका केवळ बुम उपलब्ध करून देणार असून, झाडं तोडणं, कटिंग करणं आणि ते हटवणं ही संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची असेल असं प्रशासनानं बैठकीत स्पष्ट केलं.
अनुराधा खेडकर आणि अभिजीत मोकाशी यांनी निविदा मंजूर होताच तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली. धोकादायक झाडांबाबत अर्ज प्राप्त होताच त्वरित कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पुर्वा राणे यांनी देवकरपाणंद परिसरातील धोकादायक झाडाचा मुद्दा उपस्थित करत तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी केलीय. प्रशासनाकडून संबंधित झाड काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं.
यावेळी नगरसेवक आदिल फरास यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. निविदा प्रक्रियेत झालेल्या विलंबावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. काही ठेकेदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे का, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.
प्रतिज्ञा उत्तुरे यांनी पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला. यावर प्रशासनानं सर्व ठेकेदारांकडून कागदपत्रांची तपासणी करूनच काम दिलं जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं.. तसंच एकाच ठेकेदाराकडून संपूर्ण शहरातील काम वेळेत पूर्ण होत नसल्यानं तीन ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं.अखेर सर्व सदस्यांच्या मंजुरीनं निविदा मंजूर करण्यात आली असून, आदिल फरास यांनी केलेल्या तक्रारींची पडताळणी करण्याचे आदेश सभापतींनी दिलेत. याशिवाय या सभेत अनधिकृत बांधकामं आणि व्यावसायिक आस्थापनांवरही चर्चा झाली. शहरातील मॉल आणि सुपर बाजार यांची तपासणी करून परवानगी नसलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्यात.
नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांनी काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून लाच मागितल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केलीय.तसंच बोंद्रे नगरमधील सुपर बाजारला परवानगी नसताना तो सुरू कसा होता, यावर प्रश्न उपस्थित केला.
नगरसेवक अमर समर्थ आणि प्रविण सोनवणे यांनी महापालिकेच्या जागांवर अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध गंभीर मुद्द्यांवर सखोल चर्चा झालीय. प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सदस्यांनी तातडीनं निर्णय घेण्याबाबत दबाव निर्माण केलाय.