पाणी उपसा पंपांना सील केल्या प्रकरणी कृती समितीने महापालिका प्रशासनाला धरले धारेवर...
कोल्हापूर - नदीतील उपसा केलेल्या पाण्याची थकबाकी भरली नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी २० मार्च रोजी जलसंपदा विभागाने कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पाणी पंपांना सील केले होते. या प्रश्नी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समिती, महापौर आणि आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत समितीने प्रशासनाला धारेवर धरले.
शहराला दररोज सुमारे १२० एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात २०० ते २७० एमएलडी पाणी उचलले जात असल्याचे समोर आले आहे. तरी देखील शहरात पाणी टंचाई जाणवत असल्याने वितरण व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट होत आहेत. प्रशासन झोपायचे सोंग घेतंय म्हणून पाणी विभाग बदनाम झालाय, असा आरोप बाबा इंदुलकर यांनी केला आहे.
कोट्यवधींची पाणीपट्टी वसूल करून देखील जलसंपदा विभागाची थकबाकी का भरली नाही, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे तसेच मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली.
यावेळी पाणीपट्टी थकबाकीदारांची नावे महापालिकेच्या वेबसाईटवर टाकण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. तसेच जलसंपदा विभागाने आकारलेल्या विविध शुल्कांबाबत महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेसकडे तक्रार दाखल केल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनी तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला बाबा पार्टे, अनिल कदम, प्रमोद दाभाडे, काका पवार, अशोक भंडारी यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.