तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे, यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करणार : जिल्हाधिकारी
कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात तृतीयपंथीय कल्याण हक्क संरक्षण समिती, ज्येष्ठ नागरिक समन्वय आणि सनियंत्रण समिती तसेच हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे आणि त्यांच्या पुनर्वसन अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमाले येडगे यांनी, तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सकारात्मक असून त्याचाच भाग म्हणून पिंक रिक्षा तृतीयपंथियांना चालविण्यासाठी देण्याबाबतची बाब विचाराधीन असल्याचे सांगितले. आगामी बैठकीपर्यंत उर्वरीत तृतीयपंथीयांना रेशन आणि मतदान कार्ड देण्याबाबत संबंधित विभागाने कारवाई करावी. या कामी स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तृतीयपंथियांना सन्मानाने जगता यावे, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात हाताने मैला उचलण्याच्या दृष्टीने फारसे सफाई कामगार नसले तरी स्वच्छतेच्या दृष्टीने जे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी सुरक्षा विषयक साहित्य वापरावे, तसेच अशा कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग घेण्यात यावे, अशी सूचना यावेळी केली.
यावेळी जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, महिला बाल विकास अधिकारी सुहास वाइंगडे, पोलीस उपाधिक्षक सुवर्णा पत्की, जिल्हा सह आयुक्त न. पा देवानंद ढेकळे, जिल्हा परिषदेतील सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, दीपा शिपुरकर, मैत्री संघटनेच्या सुहासिनी देवमाने, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अशासकीय सदस्य बाळासाहेब फरकाटे यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.