“खाऊ गल्लीतील ४२ गाड्यांपैकी फक्त चारच टार्गेट?” – अतिक्रमण कारवाईवर व्यावसायिकांचा संताप
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ ते शासकीय तंत्रनिकेतन रस्त्यावर असणाऱ्या खाऊ गल्लीमध्ये अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर व्यावसायिकांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. अतिक्रमण विभागाचे अधिकारी विलास साळोखे यांनी ठराविक चारच गाड्या उचलून नेल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खाऊ गल्लीमध्ये एकूण सुमारे ४२ गाड्या व्यवसाय करत असताना, वारंवार फक्त चारच गाड्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप संबंधित व्यावसायिकांनी केला आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या कारवाईत दुजाभाव होत असल्याची टीका व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. व्यवसायिकांच्या मते, या परिसरात केवळ सात जणांकडेच महापालिकेचा अधिकृत परवाना आहे. उर्वरित सर्व गाड्या बेकायदेशीर असतानाही निवडक चार गाड्यांवरच वारंवार कारवाई केली जात असल्याने “नेमकं प्रशासनाला आमच्याकडून काय हवं आहे?” असा सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. वारंवार कारवाई झालेल्या गाड्यांमध्ये रोहित माटुंगे, अविनाश रोडे , शुभम हेरले आणि नितीन बामणे यांच्या गाड्यांचा समावेश आहे.
अतिक्रमण अधिकारी विलास साळोखे हे हेतुपुरस्सर आणि राजकीय दबावातून कारवाई करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून सर्व गाड्यांबाबत समान नियम लागू करावेत, अशी मागणीही व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.