रिक्षा चालकांना नियमांचे पालन करण्याच्या वाहतूक शाखा व आरटीओकडून संयुक्त बैठकीत सूचना; २९ रिक्षांवर कारवाई
कोल्हापूर : शहरातील रिक्षा व्यवसायासंदर्भातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर तसेच शहरातील पोलिस ठाण्यांच्या वतीने रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठक सोमवारी २ मार्च २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या कार्यालयात पार पडली. बैठकीत रिक्षा स्टॉपवर क्षमतेपेक्षा जादा रिक्षा उभी करणे, सिग्नल व चौकात थांबून व्यवसाय करणे, एस.टी. स्टँड परिसरात अनधिकृत थांबे घेणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, जादा भाडे आकारणे आदी प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
रिक्षा चालकांना गणवेश वापरणे बंधनकारक असून नियमबाह्य भाडे आकारू नये, प्रवाशांशी अरेरावी करू नये, डबल पार्किंग टाळावी, विना बॅच वाहन चालवू नये तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात विशेष दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, बुधवारी ३ मार्च रोजी नियमभंग केल्याप्रकरणी २९ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी १२ रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या असून एकूण २३,४०० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच प्रलंबित १६,५०० रुपयांची दंड रक्कम वसूल करण्यात आली. मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे .