दाजीपूर अभयारण्य पर्यटन विकास कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य परिसरात पर्यटन विकासासाठी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. या विकास कामांमध्ये शिवगड परिसर विकास, माळेवाडी धरण, अॅडव्हेंचर पार्क, कृत्रिम समुद्रकिनारा, हसणे एमआय टैंक , कृत्रिम धबधबा यासारख्या कामांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
त्यांच्यासोबत प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अनिता देशमुख, विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर, वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर, प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम आणि शाखा अभियंता समीर निरुखे आदी उपस्थित होते.
ठेकेदार संस्थेचे अभियंता अजय भंडारी आणि आर्किटेक्ट अभिनंदन मगदूम यांनी यावेळी विकास कामांची सविस्तर माहिती दिली. पर्यटन विकासाच्या नावाखाली केवळ निधी खर्च करणे हे उद्दिष्ट नसावे. कामांचा दर्जा इतका उत्तम असावा की येत्या उन्हाळी सुट्टीत पर्यटकांची संख्या किमान चारपट वाढली पाहिजे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
यावेळी मंडल अधिकारी सीमा मोरये, ग्राम महसूल अधिकारी बळवंत पताडे, ग्राम विकास अधिकारी शरद गुरव, सुभाष पाटील, सरपंच प्रतिभा कोरगावकर यांच्यासह वन्यजीव, महसूल, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.