जोतिबा यात्रेत भाविकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा – जिल्हाधिकारी

स्थानिक व्यापाऱ्यांना कापडी पिशव्या रास्त भावात मिळणार 

<p>जोतिबा यात्रेत भाविकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा – जिल्हाधिकारी</p>

कोल्हापूर - श्री क्षेत्र जोतिबा चैत्र यात्रेदरम्यान भाविकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळून त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रशासनाने पर्यावरण रक्षणासाठी यंदा प्लास्टिक बंदीचा निर्णय अत्यंत कडकपणे राबवण्याचे निश्चित केले आहे. जोतिबा डोंगराचा परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्लास्टिक बंदीचा महत्वाचा  निर्णय घेण्यात आला. विशेषतः यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी अगरबत्ती, दवना, खोबरे-वाटी आणि इतर पूजा साहित्यासाठी होणारे प्लास्टिक पॅकिंग आता पूर्णपणे बंद असणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पन्हाळा व शाहूवाडी उपविभागाचे अधिकारी, देवस्थान समिती आणि स्थानिक ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. केवळ पूजा साहित्यच नव्हे, तर मिठाई, पेढे, खाद्यपदार्थ आणि खेळण्यांच्या पॅकिंगसाठीही प्लास्टिकचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिरात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक घेऊन प्रवेश असणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यात्रेमध्ये अन्न वाटप करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही प्लास्टिक पिशव्या किंवा बाटल्यांचा वापर न करता पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

या मोहिमेला यश मिळवून देण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांना कापडी पिशव्या रास्त भावात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या व्यापारी प्रतिनिधींनीही प्रशासनाच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत 'प्लास्टिक मुक्त यात्रा' यशस्वी करण्याचे आश्वासन दिले आहे. डोंगर परिसरातील नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी प्रत्येक भाविकाने सोबत कापडी पिशवी बाळगून या विधायक कार्यात सहकार्य करणे काळाची गरज बनली आहे.