कामचुकार पोलिसांवर आयुक्तांचा बडगा; ८ निलंबित, २ बडतर्फ

<p>कामचुकार पोलिसांवर आयुक्तांचा बडगा; ८ निलंबित, २ बडतर्फ</p>

मुंबई पोलीस दलात कामचुकारपणा, शिस्तभंग आणि बेकायदा फेरीवाल्यांशी संगनमत करणाऱ्या पोलिसांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निलंबन आढावा समितीच्या बैठकीत आठ पोलिसांना निलंबित, तर दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याशिवाय २३ पोलिसांचे निलंबन कायम ठेवण्यात आले आहे.

बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई टाळणे, वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन, दीर्घकाळ गैरहजर राहणे तसेच शिस्तभंगाचे गंभीर आरोप असलेल्या पोलिसांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ३० जानेवारी रोजी झालेल्या त्रैमासिक आढावा बैठकीत प्रत्येक प्रकरणाचा सविस्तर विचार करून हे निर्णय घेण्यात आले. या कारवाईमुळे मुंबई पोलीस दलात शिस्त आणि जबाबदारीचा स्पष्ट संदेश गेला असून, कामात कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका कायम राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.