चंबुखडीतील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो; लाखो लिटर पाण्याची नासाडी, महापालिका प्रशासन गाढ झोपेत...!
कोल्हापूर - चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीतून रात्रभर लाखो लिटर पाणी वाया जात असून याकडे कोल्हापूर महापालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. या पाण्यामुळे पानंद रस्ता अक्षरशः उद्ध्वस्त होत असून रस्त्यावरून वाहणारे पाणी पाहता तो रस्ता नसून जणू काही धबधबाच असल्याचा भास होत आहे.
सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र, संबंधित यंत्रणा कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. लाखो लिटर पाण्याची ही नासाडी नेमकी कोणाच्या दुर्लक्षामुळे होत आहे, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. महापालिका प्रशासन याची जबाबदारी घेणार की नेहमीप्रमाणे यावेळीही मौन बाळगणार? हा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा राहिला आहे.