गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

 

राधानगरी तालुक्यात कोंड्याच्या माळ परिसरातील घटना

<p>गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी</p>

<p> </p>

राधानगरी : आज सकाळी गव्याच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी मध्ये घडली आहे. कोंड्याच्या माळातील भातशेतीत रखवालीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर गव्याने अचानक हल्ला केल्याने त्यांच्या पायाला व पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.

कुकुडवाडी येथील नामदेव सदू शिंदे हे शेतकरी आज बुधवारी पहाटे कुंभारवाडी इथल्या "कोंड्याचा नाळवा" या परिसरातील भात शेतीमध्ये पिकांची राखण करण्यासाठी गेले होते. सकाळी आठच्या सुमारास गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ल्यात शिंदे यांच्या पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागाची रेस्क्यू टीम आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

या घटनेची माहिती मिळताच वनपाल संजय भाट, वनरक्षक जितेंद्र साबळे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून पुढील कार्यवाही सुरू असून गव्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.