बारामती विमानतळावर शिकाऊ विमान अपघातग्रस्त; सुदैवाने जीवितहानी नाही

<p>बारामती विमानतळावर शिकाऊ विमान अपघातग्रस्त; सुदैवाने जीवितहानी नाही</p>

बारामती — बारामती विमानतळावर शनिवारी (दि. ९) रोजी सकाळी ७:४५ वाजता रेड बर्ड एव्हिएशन या खासगी प्रशिक्षण संस्थेच्या मालकीचे एक शिकाऊ विमान अपघातग्रस्त झाले. या विमानात विवेक यादव (वय २४, मुंबई) हा प्रशिक्षणार्थी पायलट होता. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन व संस्थेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकृत तपास सुरू करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडूनही या घटनेचा स्वतंत्र तपास होण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे बारामतीमधील नागरिकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंतेची भावना व्यक्त होत आहे. "हे विमान जर एखाद्या घरावर, शाळेवर किंवा एमआयडीसीमधील कंपनीवर कोसळले असते, तर मोठी दुर्घटना घडली असती," अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, रेड बर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाचा हा गेल्या दोन वर्षांतील तिसरा अपघात आहे, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी या अपघाताची गंभीर दखल घेऊन अधिक सुरक्षितता उपायांची मागणी केली आहे.