‘या’ विमान अपघाताची धक्कादायक माहिती आली समोर...
अपघात तांत्रिक दोषामुळे नव्हे तर पायलटने जाणूनबुजून घडवला
नवी दिल्ली – काही महिन्यापूर्वी अहमदाबाद येथे विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात एक प्रवासी वगळता सर्व २६० प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या अपघाताची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अहमदाबादमध्ये झालेला विमान अपघात तांत्रिक दोषामुळे न होता पायलटने जाणूनबुजून घडवला असल्याचा अहवाल भारतीय तपास यंत्रणा तयार करत असल्याचा दावा इटालियन दैनिक कोरीएर डेला सेराच्या वृत्तातून समोर आला आहे.
“भारतीय तपास यंत्रणांनी असे निश्चित केले आहे की, १२ जून २०२५ रोजी इंजिनमध्ये इंधन पुरवठा बंद झाल्यानंतर झालेला अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता तर जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे झाला होता आणि अधिकारी आता त्यांचा अंतिम अहवाल तयार करत आहेत. या तपासात अमेरिकन तज्ज्ञही मदत करत आहेत”, असं वृत्तपत्रामधील वृत्तात म्हटले आहे.
एअर इंडियाद्वारे चालवले जाणारे बोईंग ७८७ ड्रीमलायनर अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळले होते. या दुर्घटनेत एकूण २६० लोक मृत्युमुखी पडले. ज्या वैद्यकीय महाविद्यालयावर हे विमान कोसळलं, त्या महाविद्यालयातील विद्यार्थीही मृत पावले. जुलै २०२५ मध्ये भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात एका पायलटने इंधन नियंत्रण बंद केल्याचा उल्लेख आहे. कारण, कॉकपिटचे व्हॉइस रेकॉर्डिंग समोर आले असून त्यात पायलटबरोबर झालेला संवाद ऐकू येत आहे. “तुम्ही (इंधन) का कापले?” असं एका पायलटने विचारलं असता दुसऱ्या पायलटने म्हटलं, “मी तसे केले नाही.” दोघांपैकी एका पायलटने इंधन नियंत्रण स्विच बंद केले होते. यामुळे विमानाची शक्ती गेली आणि ते जमिनीवर कोसळले. कॅप्टन सुमित सभरवाल हे पायलट-इन-कमांड होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे सह-पायलट होते, असं या वृत्तपत्राने म्हटले आहे.