मुंबई – डीजे, डॉल्बी ही उत्तरेतील संस्कृती महाराष्ट्रात आणतोय का? गोविंदाच्यावेळी काही महिलांना व्यासपीठावर आणून नाचवलं जातं, हे सगळं युपी, बिहारमध्ये चालतं, आपण त्यांना शिकवायचं की आपण त्यांची संस्कृती इकडे आणायची, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते आज ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
राज ठाकरे म्हटले आहे कि, कुठे नेतोय आपण सण, टिळकांनी कशासाठी सुरु केला सण, आपण कुठे नेऊन ठेवलाय तो. तुम्ही धर्मात बेभान होऊ नये. उत्सव हा ठीक आहे, पण धर्मांधपणा वाईट आहे, तो खड्ड्यातच घेऊन जाणारा आहे, सण कसे साजरे व्हावेत, याचं प्रोटोकॉल असले पाहिजे, आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे ही गोष्ट केली पाहिजे. लेझर लाईट मारतात, त्याने डोळे गेले, हार्टचा त्रास असणारी माणसं डॉल्बीच्या आवाजाने मरु शकतात.
आता गणपती येणार आहे. मला सर्वात जास्त भीती आहे की, यात दंगली घडवल्या जातील. जेणेकरून तुम्ही त्यात अडकाल आणि बाकी ठिकाणांवरून तुमचं लक्ष हटेल. आताच मुंबईत एक-दोन घटना घडल्या आहेत. जो सुजाण हिंदू आहे आणि जो सुजाण मुस्लिम आहे, त्यांना मी सांगतोय सतर्क रहा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
