संदीप देशपांडे-राऊतांच्या शाब्दिक वादामुळे राज-उद्धव युती संकटात

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम, 'महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हा भावांमधील वाद मी बाजूला ठेवायला तयार आहे', असे वक्तव्य केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तेव्हापासून ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मनोमीलन सुरु झाले होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याने ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर मनसेचे मुंबई विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) हे सातत्याने ठाकरेंविरोधात आक्रमक वक्तव्य करत आहेत. या टीकेला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले होते. देशपांडे आणि राऊत यांच्यातील या शाब्दिक वादामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याच्या शक्यता मावळत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.