खासदार संजय मंडलिक होतायत ट्रोल...

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणी करिता आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे आता राज्यभर परिचीत झालेत. अगदी लहान मुलापासून अबाल वृद्धा पर्यंत मनोज जरांगे पाटील म्हणजे कोण. हे आता सांगण्याची गरज नाही. मात्र, शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख अशोक जरांगे पाटील असा केला. आज दसरा चौकात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खास. मंडलिक गेले होते. साखळी उपोषणात सहभागी झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार मंडलिक यांनी मनोज ऐवजी अशोक जरांगे पाटील असं चुकीचं नाव घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. आंदोलनस्थळी याची चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान, खासदार संजय मंडलिक हे त्यांच्या अशा काही वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना खा.मंडलिक यांनी हिंदीमध्ये भाषण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचं हिंदीतील भाषण ऐकून खुद्द शहा यांनीच खा. मंडलिक यांना थांबवत, मराठीत भाषण करा असाच सल्ला दिला. तेव्हांही खा. मंडलिक चांगलेच ट्रोल झाले होते.