शिवगड किल्ल्यावर पद्भ्रमंती करून "यांनी" स्वराज्याच्या जागवल्या पायवाटा...

शिवगड किल्ल्यावर पद्भ्रमंती करून "यांनी" स्वराज्याच्या जागवल्या पायवाटा...माजी आमदार ऋतुराज पाटील शिवगड मोहीम..
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी डॉ. डी वाय पाटील ग्रुपच्या सहकार्यातून दरवर्षी एका किल्ल्यावर पदभ्रमंती केली जाते. त्यानुसार यावर्षी अठ्ठावीस जूनला कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या माध्यमातून राधानगरीच्या दाजीपुर अभयारण्यात असणाऱ्या शिवगड किल्ल्यावर पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात आली. राधानगरीच्या दाजीपुर अभयारण्यामध्ये असलेला शिवगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू करवीरकर घराण्याचे संभाजी महाराज यांनी बांधलाय. फोडा घाटासह कोकणातील इतर भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या मालावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. पण सावंतवाडीचे संस्थानिक असलेल्या सावंत घराण्याला या किल्ल्यावर वर्चस्व हवं होतं. या संघर्षातून सावंत घराणं आणि करवीरकर घराण्यातील संभाजी महाराज यांच्यामध्ये सतत युद्ध व्हायचं. हा चिलखती बुरुज बांधणीचा किल्ला युद्ध सुरु असतानाच बांधलाय असा इतिहासात संदर्भ आहे. किल्ला बांधल्यानंतर किल्ल्याकडे येणाऱ्या वाटा मजबूत करण्यासाठी, आणि वाटांमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली असं सांगण्यात येतंय. शिवगडचा इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी डॉ. डी वाय पाटील ग्रुपच्या सहकार्यातून आणि एनएसयुआय च्या माध्यमातून पदभ्रमंती मोहीम राबविण्यात आली.
रविवारी सकाळी कोल्हापुरातील साळोखे नगर इथल्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून सुमारे एकशे सत्तर जणांचा ताफा दाजीपूर जंगलाकडे रवाना झाला. हा ताफा दाजीपूर ओलवण इथल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यानंतर वनखात्याचे आरएफओ राजेंद्र घुणकीकर, वनपाल अमोल चव्हाण, आणि वनरक्षक मोहन देसाई या अधिकाऱ्यांनी सरपंच संदीप डवर, वैभव तहशिलदार, इतिहास अभ्यासक राम यादव यांच्या उपस्थितीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांच पुष्पगुच्छ देवून स्वागत केलं. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सिद्धी इनामदार, श्वेता खाडे, सौरभ जाधव, कपिल कदम, तौफिक मिरशिकारी या सर्व मेटार चं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी इतिहास अभ्यासक राम यादव यांनी शिवगड किल्ल्याबाबत माहिती देवून सूचना केल्या. वन्यजीव अभ्यासक असणारे देवेंद्र भोसले यांनी प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र आणि सूचना दिल्यानंतर ठक्याचा वाडा प्रवेशद्वारापासून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदभ्रमंती मोहिमेला सुरवात झाली. किर्र जंगल, पावसाची रिमझिम, झुळझुळ वाहणारं वारं आणि खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांच्या सान्निध्यातून वाट काढत, निसर्गाचा आनंद घेत मोहीम पुढं पुढं निघाली. वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले आणि प्राणीमित्र विनायक आळवेकर यांनी मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी थांबून निसर्गातील झाडे, वेली, साप अशा विविध घटकांबाबत माहिती दिली. शिवगड प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सूचना दिल्या. यावेळी मार्गावरील झांजेचं पाणी इथं चौदा वर्ष तपस्या केलेल्या गगनगिरी महाराजांच्या मठाला माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट दिली. मठामध्ये दीपक महाराज यांनी त्यांचं स्वागत करून मठाबाबत माहिती दिली. यानंतर दोन किलोमीटर अंतर असणाऱ्या अवघड दरीतून प्रवास सुरु झाला. अतिशय खडतर आणि बिकट मार्ग असणाऱ्या एकेरी वाटेवरून चालताना अनेकांचे पाय अडखळत होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं प्रत्येकाच्या शरीरामध्ये स्फुरण चढत होतं. सुमारे दहा किलोमीटरचा दऱ्या खोऱ्यांचा हा खडतर प्रवास पार करत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत शिवगडावर पोहचताच भगवा झेंडा डौलानं फडकावला.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा यासाठी आमचा हा प्रयत्न असून यापुढं यापेक्षाही मोठी मोहीम राबवू अशी ग्वाही दिली.
ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी एनएसयुआय चे पदाधिकारी अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ, प्रफुल्ल चौगुले, अथर्व चौगुले, रोहित गाडीवडर, प्रणव पाटील, स्वराज्य भाट, यश शिर्के, उदित नांद्रे, ऋतुराज पाटील, प्रथमेश पाटील यांचं सहकार्य लाभलं.