छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती शाहू महाराज ही अशी व्यक्ती होती की ज्यांनी राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळीक ठेवली. अशा या राजाला त्यांच्या जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन करू, त्यासाठी या शुभेच्छा संदेश उपयोगी येतील.
सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे. रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं कार्य महान आहे. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा आग्रह धरला. अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडित क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबविली. त्यांनी कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रांच्या विकासासाठी दूरदृष्टीने प्रकल्प, योजना राबविल्या. त्याद्वारेही सामाजिक अभिसरण होईल असे नियोजन केले. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास शाहू महारादांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.