काळम्मावाडी धरणाची सुरक्षा रामभरोसे...
काळम्मावाडी धरणाच्या सुरक्षेचा भार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर...
कोल्हापूर - राधानगरीतील काळम्मावाडी येथील दूधगंगा धरणातून कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्याला पाणी पुरवठा केला जातो. २५.४० टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या या दुधगंगा धरणावर वीजनिर्मिती प्रकल्प आहे. मात्र या धरणावर असलेले सुरक्षा रक्षक निवृत्त झाले तरी नव्या सुरक्षा रक्षकांची भरती केलेली नाही. या महत्वाच्या ठिकाणी एकही नियुक्त जबाबदार कर्मचारी नाही, फक्त पाच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आधारावर संपूर्ण सुरक्षा उभी आहे. या धरणावर पोलीस बंदोबस्त नाही, जलसंपदा विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी मुख्य चौकीवर कायमस्वरूपी हजर नसतात, त्यामुळे धरणाची सुरक्षा रामभरोशी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
धरणासाठी कोणताही स्पष्ट सुरक्षा आराखडा नाही. धरणाच्या सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर अनेक बेरोजगार तरुण उपलब्ध असून त्यांना नोकरी दिल्यास सुरक्षेसोबत त्यांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. मात्र शासन याकडे डोळेझाक करत आहे. शासन आणि जलसंपदा विभाग भयावह दुर्घटना घडल्यावरच जागे होणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. धरणावर स्थायी पोलीस चौकी आणि कर्मचारी नेमावेत. स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.