कोल्हापूर रेल्वे स्थानकात महिलेवर अतिप्रसंग ?
05 May 2025, 07:58:57 PM
Share
कोल्हापूर रेल्वे स्थानकात सुपरवायझरनं एका जबाबदार अधिकार्याच्या केबिनमध्येच एका महिलेवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. गेल्या सोमवारी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार घडलाय. ही घटना घडल्यापासून पीडित महिला भयभीत झाली होती. दरम्यान, काल पीडित महिलेनं ही घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर आज सकाळी पीडित महिला रहात असलेल्या परिसरातील नागरिक या घटनेचा जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येनं कोल्हापूर रेल्वे स्थानकात जमा झाले. रात्री उशिरापर्यंत पिडीत महिलेचे नातेवाईक आणि शेजारी राहणारे नागरिक हे सुपरवायझरच्या विरोधात रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी थांबून होते. दरम्यान, याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशी घटना घडली असल्यास फिर्यादीचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असं सांगितलय. कोल्हापूर रेल्वे स्थानक परिसरातच घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळं एकच खळबळ उडाली असून रेल्वे स्थानकातील महिलांच्या सुरक्षेबद्दल सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त होतोय .