केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे कौतुक
कोल्हापूर – सध्याचे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कौतुक करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रशंसा प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल हे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. छत्तीसगड सीमावर्तीय अतिदुर्गम कोटकुल गावापासून प्रेरणा घेवून त्यांनी नक्षलग्रस्त भागातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा अभिनव उपक्रम राबवला आहे. यांतर्गत सुमारे 73 सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना केली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी त्यांना नेक्सस ऑफ गुड या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
निलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्तीय भागात राबवण्यात आलेल्या यशस्वी मोहिमांमुळे नक्षल विरोधी कारवायांना गती मिळाली आहे. याची दखल घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना विशेष प्रशंसा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.