अमेरिकेच्या 'व्हाईट हाऊस' बाहेर अंदाधुंद गोळीबार…
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या 'व्हाईट हाऊस' कॉम्प्लेक्सबाहेर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारानंतर अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी केलेल्या कारवाईत संशयित जागीच ठार झाला आहे. नासीर बेस्ट (वय २१) असे या मृत हल्लेखोराचे नाव होते. या घटनेनंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फेडरल सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “व्हाईट हाऊसच्या वेशीजवळ सीक्रेट सर्विस एजंट्ससोबत झालेल्या गोळीबाराच्या चकमकीनंतर तो बंदूकधारी ठार झाला आहे. ही घटना ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर’ मधील गोळीबाराच्या घटनेनंतर बरोबर एका महिन्याने घडली आहे आणि यावरून हे सिद्ध होते की, भविष्यातील सर्व राष्ट्राध्यक्षांसाठी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये आजवरची सर्वात सुरक्षित आणि अभेद्य जागा निर्माण करणे किती महत्त्वाचे आहे. आपल्या देशाची राष्ट्रीय सुरक्षा याची मागणी करते” असे त्यांनी म्हटले आहे.