‘...तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये’ : कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना सल्ला
मुंबई - येत्या 29 मेपर्यंत राज्यात मान्सूनपूर्व पाऊस दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात नेहमीच्या वेळेपेक्षा मान्सून लवकर येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी पेरणीबाबत शेतकऱ्यांनी अजिबात घाईगडबड करू नये, असा महत्वाचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.
"जोपर्यंत शेतात किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.