खर्चीवाले यंत्रमागधारकांचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता
इचलकरंजी - शहरात खर्चीवाले यंत्रमाग धारकांचे आंदोलन सध्या तापू लागले आहे. मजुरी वाढ मिळावी, यासाठी कारखाने बंद ठेवून त्यांनी गेल्या तीन आठवड्यापासून आंदोलन सुरू केले आहे. याबाबत गेल्या काही दिवसापासून प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात दोन बैठका झाल्या. मात्र बैठकीला ट्रेडिंगधारकांनी पाठ फिरवली. दरम्यान माजी अध्यक्षांच्या घरावर दगडफेक तसेच दत्तनगर परिसरामध्ये काही यंत्रमाग कारखान्यात जाऊन बिमे कापल्याच्या कारणावरून काही आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याची माहिती आंदोलकांना मिळताच सुमारे २०० ते २५० खर्चीवाले यंत्रमाग आंदोलकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. आमचे आंदोलन उद्यापासून तीव्र करत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी केले आहे.