‘त्या’ मद्यपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने दिला दणका... 

तपासणी मोहीमेत सापडले सात एसटी कर्मचारी 

<p>‘त्या’ मद्यपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने दिला दणका... </p>

मुंबई - एसटी महामंडळाने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक राज्यातील महामंडळात चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची मोहीम राबवली. त्यावेळी महामंडळाच्या तपास अधिकाऱ्यांना एक स्वच्छता कर्मचारी, एक वाहक, २ चालक, ३ यांत्रिक कर्मचारी दोषी आढळले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 
राज्य परिवहन महामंडळामधील काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत संशयास्पद एकूण ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिक कर्मचारी व इतर कर्मचारी अशा सुमारे १,७०१ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

यावेळी धुळे विभागाच्या तपासणीत एक यांत्रिक कर्मचारी, एक स्वच्छता कर्मचारी आणि एक चालक मद्यपान करताना आढळले. नाशिकमध्ये एक चालक, नांदेड विभागामध्ये एक वाहक, परभणी आणि भंडारा विभागात प्रत्येकी एक यांत्रिक कर्मचारी मद्यपान करून काम करताना आढळले. एसटी महामंडळाने त्या सात कर्मचाऱ्यांवर पुढील कार्यवाही सुरू केली असून, या मोहिमेचा अहवाल तातडीने मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात सादर केला जाणार आहे.