कोल्हापूरातील गणेश विसर्जन मिरवणूकीच्या थेट प्रक्षेपणासाठी जीटीपीएल एसपीएन सज्ज

<p>कोल्हापूरातील गणेश विसर्जन मिरवणूकीच्या थेट प्रक्षेपणासाठी जीटीपीएल एसपीएन सज्ज</p>

उद्या अनंत चतुर्दशीला राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचं विसर्जन होणारय. मूर्ती विसर्जना अगोदर निघाणाऱ्या मिरवणूकांचं गणेशभक्तांना विशेष आकर्षण असतं. कोल्हापूर शहर वैशिष्ट्यपूर्ण विसर्जन मिरवणूकांसाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या अभिमानास्पद परंपरांचं दर्शन घडवत, सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य करत, धार्मिक आणि जातीय सलोख्याचा संदेश देत कोल्हापूर शहरातील मंडळांच्या विसर्जन मिरवणूकांचं जगभरात विखुरलेल्या कोल्हापूरकरां मध्ये औत्सुक्य असतं. ज्यांना प्रत्यक्ष कोल्हापूरात येऊन विसर्जन मिरवणूका पाहता येणार नाहीत अशा गणेशभक्तांसाठी जीटीपीएल एसपीएन डीजीटल नेटवर्कच्या एस भक्ती चॅनल क्रमांक पाचशे एकोणसाठ आणि एस न्यूज कोल्हापूर या युट्यूब चॅनलवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येतं. यावर्षीच्या थेट प्रक्षेपणासाठी जीटीपीएल एसपीएन डीजीटलच्या तंत्रज्ञांची टीम जय्यत तयारी करतीय. शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावरील मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक, पापाची तिकटी, इराणी खण आणि कसबा बावडा या ठिकाणच्या स्थिर कॅमेऱ्यांसह एस न्यूजचे रिपोर्टर कॅमेरामन मिरवणूक मार्गासह विसर्जनाच्या ठिकाणची प्रत्येक क्षणाची माहिती या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून गणेशभक्तां पर्यंत पोहचवण्यात येणारय. दरवर्षी एस भक्ती वाहिनीवरून तसंच एस न्यूज कोल्हापूर या युट्यूब चॅनलवरून करण्यात येणाऱ्या थेट प्रक्षेपणाला जगभरातील कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. यावर्षी एस न्यूज कोल्हापूर या इन्स्टाग्राम पेजवरुन सुध्दा ही मिरवणूक आपल्याला लाईव्ह पाहता येणारय.