*“काय पाहिजे सांगा?” फलकांनी वेधले लक्ष; मुरगूड नगरपरिषद निवडणुकीपूर्वी ‘अनोख्या फलकां’ची चर्चा

<p>*“काय पाहिजे सांगा?” फलकांनी वेधले लक्ष; मुरगूड नगरपरिषद निवडणुकीपूर्वी ‘अनोख्या फलकां’ची चर्चा</p>

मुरगूड : नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवार आणि पक्ष नेतेमंडळींकडून बैठका, भेटीगाठी तसेच आश्वासनांचा वर्षाव सुरू झाला असतानाच शहरातील सात ते आठ प्रमुख चौकात लावण्यात आलेल्या अनोख्या फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

या फलकांवर मोठ्या अक्षरांत लिहिले आहे –

“काय पाहिजे सांगा? मी तुमचं काम करतो, पोरग्याला नोकरीला लावतो, सुनेची शाळेत ऑर्डर काढतो, बँकेत कामाला लावतो, कारखान्यात ऑर्डर काढतो... मग आता पतूर कुठं होतास?”

अशा उपरोधिक व टोचून बोलणाऱ्या शैलीतील मजकुरामुळे हे फलक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत. लाल रंगातील हे फलक मध्यरात्री एस.टी. स्टँड, गणेश मंदिर, मुख्य रोड, हनुमान मंदिर, अंबाबाई मंदिर आदी ठिकाणी अज्ञातांनी लावले असल्याचे समजते. या फलकांवर “सुजाण मुरगूडकर” असे नाव दिलेले असून, हे नेमके कोणी लावले याबाबत मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, शहरात येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उपरोधिक फलकांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नागरिकांमध्ये या फलकांबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी याचे स्वागत करत “निवडणुकीच्या वेळी जागरूकतेचा संदेश देणारा अभिनव प्रयत्न” असे मत व्यक्त केले आहे, तर काही जणांनी यामागे राजकीय डावपेच असल्याची शक्यता वर्तवली आहे. या फलकांमुळे मुरगूडमध्ये निवडणुकीपूर्वीचे वातावरण रंगीबेरंगी आणि चर्चास्पद बनले आहे.