कोल्हापूर जिल्ह्यात ६९ हजारांहून अधिक तपासण्या; दहा गरोदर मातांसह २६७ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह
कोल्हापूर : जिल्ह्यात यंदा आतापर्यंत झालेल्या एचआयव्ही तपासण्यांमध्ये तब्बल २६७ जण पॉझिटिव्ह आढळले असून, यामध्ये १० गरोदर महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या ६९ हजार ४७० चाचण्यांपैकी ०.४ टक्के रुग्ण एचआयव्ही बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील ३४ हजार ३५६ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० महिला पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. मात्र, वेळेत औषधोपचार व देखरेखीमुळे या मातांपासून जन्मलेल्या ३८ बालकांपैकी एकाही बालकाला एचआयव्ही संसर्ग झालेला नाही, ही अत्यंत समाधानकारक बाब असल्याचे जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे होते.
दरम्यान, सेक्स वर्कर, स्थलांतरित कामगार, क्षयरोगी आणि गरोदर महिला या जोखीम गटांमधील व्यक्तींच्या १०० टक्के एचआयव्ही तपासण्या केल्या पाहिजेत. आवश्यकता भासल्यास तपासणी किटसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे येडगे यांनी सांगितले.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, तसेच एआरटी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, लिंक्ड एआरटी सेंटर समुपदेशक, जिल्हा समुदाय संसाधन समिती सदस्य आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.