कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग आरक्षणाची आज सोडत ; ८१ जागांसाठी उत्सुकता शिगेला
कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची आज (११ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीकडे इच्छुक उमेदवारांसह नागरिकांचेही लक्ष लागले असून २० प्रभागांतील ८१ जागांसाठी आरक्षण निश्चित होणार आहे.
यंदाच्या सोडतीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ठिकाणाची पाहणी केली आहे. या सोडतीसाठी सुमारे ३० ते ४० अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यावर्षी प्रथमच चार सदस्यीय प्रभागरचना राबविण्यात आली असून मागील आरक्षणाचा यावर कोणताही प्रभाव राहणार नाही.
आरक्षणाचे स्वरूप -
महापालिकेतील एकूण २० प्रभागांपैकी १९ प्रभागांत प्रत्येकी चार सदस्य, तर २० व्या प्रभागात पाच सदस्य निवडले जाणार आहेत. एकूण ८१ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी ११, तर ओबीसी प्रवर्गासाठी २१ जागा आरक्षित राहतील. उर्वरित जागा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी असतील.
प्रत्येक प्रभागात अ, ब, क, ड अशी रचना करण्यात आली आहे. चार सदस्यीय प्रभागात दोन, तर पाच सदस्यीय प्रभागात तीन महिला सदस्य निवडणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या प्रभागात एससी किंवा ओबीसी महिलांचे आरक्षण असेल, त्या प्रभागात खुल्या प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार नाही.
1. अनुसूचित जाती प्रवर्गातील ११ जागांची घोषणा
2. ओबीसी प्रवर्गातील २१ जागांची घोषणा (शेवटच्या प्रभागात दोन जागा)
3. एससी महिलांसाठी ६ जागांची सोडत
4. ओबीसी महिलांसाठी ६ जागांची सोडत
5. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी २४ जागांचे आरक्षण
6. उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी
थेट प्रक्षेपण आणि जनसहभाग -
नागरिकांना सोडतीचा थेट अनुभव घेता यावा म्हणून नाट्यगृहात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. तसेच सोडतीचे थेट प्रक्षेपण "एसन्यूज" या वाहिनीवर तसेच फेसबुकवरील facebook.com/kolhapurcorporation या लिंकवरून पाहता येणार आहे.
सोडतीचे स्थळ बदल -
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या संवर्धनाचे काम सुरू असल्याने यंदा प्रथमच सोडत इतर ठिकाणी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे.