नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला...!
प्रेमप्रकरणातून वैर – तीन तरुणांनी केला जीव घेण्याचा प्रयत्न
हिंजवडी : शनिवारी दुपारची वेळ. हिंजवडीतील साखरे वस्ती परिसर नेहमीप्रमाणे शांत होता. पण काही क्षणांतच त्या भागात आरडाओरड, गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. एक तरुण कोयता घेऊन हातात धावत होता आणि त्याच्या मागे दोन साथीदार. त्यांच्या समोर एक १८ वर्षांची तरुणी जीव वाचवण्यासाठी पळत होती…आणि क्षणार्धात कोयत्याचे वार झाले...! ही तरुणी मूळची नाशिकची असून, सध्या ती हिंजवडीत वास्तव्यास आहे. संशयित योगेश भालेराव (२५, रा. कासारसाई), त्याचा मित्र प्रेम लक्ष्मण वाघमारे (२०) आणि एक अल्पवयीन साथीदार यांनी मिळून हा भयंकर प्रकार घडवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश आणि पीडित तरुणी यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. परंतु अलीकडेच दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादातूनच रागाच्या भरात योगेशने मित्रांच्या मदतीने तरुणीचा जीव घेण्याचा कट रचला. शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास तिघांनी तरुणीला गाठून तिच्यावर डोक्यात, मानेवर आणि हातावर कोयत्याने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात ती कोसळली. आसपासच्या नागरिकांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली आणि पोलिसांना तात्काळ माहिती दिली. हिंजवडी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून तिन्ही संशयितांना अटक केली. पीडित तरुणीला गंभीर अवस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीत हा प्रकार प्रेमसंबंधातून झालेल्या वैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने हिंजवडी परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.