हनुमान नगरमधील खुनातील आरोपीला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

<p>हनुमान नगरमधील खुनातील आरोपीला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी</p>

कोल्हापूर - कोल्हापुरातील हनुमान नगरमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका वृद्ध रिक्षाचालकाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडलीय. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासात आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

हनुमान नगरमधील मोहन पोवार हे वृद्ध रिक्षाचालक आपल्या मुलासह राहत होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त बाहेर गेला होता. दरम्यान, पोवार यांचा वर्गमित्र चंद्रकांत शेळके त्यांच्या घरी आला. गप्पांदरम्यान जुन्या विषयातून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात चंद्रकांत शेळकेने मोहन पोवार यांचा चाकूने गळा चिरून खून केला. खून केल्यानंतर शेळकेने घटनास्थळावरून पळ काढला. त्याच वेळी पोवार यांच्या घराला आग लागली. आग विझवण्यासाठी धावलेल्या स्थानिक नागरिकांना मोहन पोवार यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रथम अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चार तासांतच चंद्रकांत शेळकेला अटक केली. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. आरोपी चंद्रकांत शेळके याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास जुना राजवाडा पोलीस करतायत.