दौलत-अथर्व कारखान्यातील कामगार वाद तीव्र; शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा

<p>दौलत-अथर्व कारखान्यातील कामगार वाद तीव्र; शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा</p>

चंदगड :  दौलत-अथर्व साखर कारखान्यातील कामगार आणि प्रशासन यांच्यातील सुरू असलेला वाद आता टोकाला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या असूनही त्रिसदस्यीय करार ही मागणी प्रलंबित राहिल्याने कर्मचारी अद्याप कामावर रुजू झालेले नाहीत. दरम्यान, तालुक्यातील इतर कोणत्याही कारखान्याला त्रिसदस्यीय करार लागू नाही, मग फक्त दौलत-अथर्व कारखान्यालाच का लागू केला जातो? असा प्रश्न चंदगडच्या शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

जिल्ह्यातील इतर सर्व कारखाने सुरु झाले असतानाही दौलत-अथर्व कारखाना बंद असल्याने शेतकरी, वाहतूकदार आणि तोडणीदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कारखाना सुरू झाला नाही, तर आम्ही कारखान्याच्या गेटसमोर आत्महत्या करू, असा इशारा शेतकरी, वाहतूकदार आणि तोडणीदारांनी दिला आहे. काहींनी तर “चौगुले व नारकर यांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून झाडावर आत्महत्या करू” असा इशारा दिला आहे.