कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऊसाचा बुडका दाखवणार-राजू  शेट्टींचा इशारा

ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय, कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही- राजू शेट्टी

<h3>कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऊसाचा बुडका दाखवणार-राजू  शेट्टींचा इशारा</h3>

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक शासकीय विश्रामगृहावर आज आयोजित करण्यात आली. संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला,  संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं  उपस्थित होते. यावेळी बोलताना राजू  शेट्टी यांनी, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येवून ३४०० ते ३४५० पर्यंत पहिली उचल देत आहेत. ही उचल आम्हाला मान्य नसल्याचं सांगितलं. ऊस परिषदेत केलेल्या ३ हजार ७५१ रूपयाबाबत तोडगा नाही झाला तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला.


राज्य सरकारनं  साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्या सोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापुर्वी तोडगा काढावा अशी आमची अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार आणि कारखानदार या मागणीकडं  दुर्लक्ष करत असल्याचा आरोप  शेट्टी यांनी केला. 


सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफ.आर. पी. जाहीर केलीय . मात्र हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळं  कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी  3 नोव्हेंबरला कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीं  सोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलय. जर या बैठकीत ऊस दराचा तोडगा निघाला नाहीतर 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऊसाचा बुडका दाखविण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी  दिलाय ..


गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळविले आहेत. यावर्षीसुध्दा साखर, इथेनॅाल, मोलॅसिस, बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीला  कारखानदारांनी गुंडाच्या करवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलीय. यामुळं शेतकऱ्यांनी   संघटित होवून आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याच बरोबरच ७ नोव्हेंबरला करवीर तालुक्यातील निगवेमधून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याचं राजू  शेट्टी यांनी सांगितलं.